Wednesday, August 02, 2006

बुधवार दुपार..आज मी घरी आहे. बाहेर चाललेला ऊन पावसाचा खेळ ह्युस्टन मधेही मला श्रावण महिन्याची आठवण करुन देतोय.
श्रावण महिना लहानपणा पासुन मला फ़ार आवडायचा. माझा वाढदिवस श्रावणातला. आमच्या घरात वाढदिवस तिथीने साजरा करायचे. त्यामुळे एकदा घरी तिथीने आणि एकदा मैत्रिणींबरोबर तारखेने असे दोन वाढदिवस साजरे होत.
शिवाय कितीतरी सणांनी हा महिना गजबजलेला असे. दर सोमवारी उपवासाचे पदार्थ खायला मिळत. मंगळवारी कुठे ना कुठे मंगळागौर असे आणि शुक्रवारी पुरणपोळी.
शाळेतही श्रावणी शुक्रवारच हळदी कुंकु असे. मग वर्ग सजवणे, रांगोळ्या काढणे, साडी नेसुन शाळेत जाणे ह्या सगळ्यात एक वेगळीच मजा असायची.
श्रावणातला माझा अजून एक आवडता कार्यक्रम म्हणजे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा. हिरव्यागार झाडांमधून दिसणारय़ा सह्याद्रिच्या रांगा, खळखळणारे ओढे, भाताची शेती आणि त्यातून जाणारा चिखलाचा मऊ मऊ रस्ता! हे सगळ अनुभवायला आमच्या घरातले सगळेच उत्सुक असायचे. ही २० मैलाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मात्र पायांची चांगलीच वाट लागत असे. आई पाय शेकण्यासाठी एका बादलीमधे गरम पाणी देत असे. मी सहा-सात वर्षांची असताना मला चालणं झेपणार नाही असा विचार करून घरातले सगळे मला चुकवून प्रदक्षिणेला गेले तेव्हा मात्र मला राग आवरेनासा झाला होता. निसर्गाला एवढ्या जवळून भेटण्याची माझ्या आयुष्यातली ती पहिली संधी होती. त्यामुळेच मला अजूनही तो निसर्ग खूप जवळचा वाटतो.

No comments: