Thursday, August 10, 2006

माझी ऑफिसमधली सगळ्यात आवडती जागा म्हणजे माझ्या उजव्या हाताची काचेची भलीमोठी खिडकी.
आजूबाजूच्या यन्त्रिक जीवनातून बाहेर पडावस वाटल की मी त्या खिडकीत जाऊन उभी राहते.
ह्या सहाव्या मजल्यावरुन मला लाम्बच लाम्ब पसरलेली हिरवळ दिसते. एका छोट्याश्या रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावलेली उन्चच उन्च झाड दिसतात.
एक लहानसा कारँजा दिसतो.
हे सगळ बघून मन प्रसन्न होत. आणि मग परत कामाचा उत्साह येतो.
ह्याच खिडकीने मला श्रावण आल्याची जाणिव करुन दिली. गेले काही दिवस रोज ऊन पावसाचा खेळ मी ह्या खिडकीतून बघतेय.
आज मात्र विजान्चा कडकडाट करत पावसाने जोरात आपली हजेरी लावली. असा जोरात पाऊस झाला की खालच्या रस्त्यावर पाणी साचायला लागत आणि त्या पाण्यामुळे रहदारीचा वेग मन्दावतो. मग एका बाजूला लाल आणि दुसरया बाजूला पिवळ्या दिव्यान्ची माळ फार सुन्दर दिसते.
चला साडेपाच वाजले. मी ही त्या माळेतला एक मणि होऊन घराकडे कूच करते.

No comments: